Advt.

Advt.

Friday 4 September 2015

दुकानांची देवळे आणि ग्राहक देव

-महावीर सांगलीकर 

अनेक दुकानदार आपल्या दुकानांत देवादिकांचे, साधू-संतांचे फोटो लावतात. हे फोटो गिऱ्हाईकास सहज दिसतील अशा ठिकाणी लावलेले असतात. कांही दुकानदार तर रोज सकाळी आणि संध्याकाळी या फोटोंची पूजाअर्चा करतात. मी कांही असे दुकानदार बघितले आहेत की जे आपल्या दुकानातील सर्व नोकरांसह रोज संध्याकाळी अर्धाएक तास त्या फोटोंची साग्रसंगीत पूजा करतात.

ग्राहक हाच देव असे एकीकडे (नुसतेच) म्हणायचे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत दुकानात देवादिकांची पूजा करायची ही काय भानगड आहे?

तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेलात, एखाद्या कार्पोरेट ऑफीसमध्ये गेलात तर तुम्हाला हा प्रकार दिसणार नाही. ‘किरकोळ’ दुकानदारच असे प्रकार करत असल्याचे दिसते.

तुम्ही दुकानदार असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत:
तुमच्या दुकानात येणारा पैसा हा ग्राहक आणत असतो. हा ग्राहक ना तुमचा देव पाठवतो, ना तुम्ही करत असलेली पूजा अर्चा. उलट तुमच्या दुकानात पूजा अर्चा चालू असेल तर येणारे गिऱ्हाईक पुढच्या दुकानात निघून जाते. 

तुमचे ग्राहक सर्वधर्मीय असतात. तुम्ही जेंव्हा तुमच्या दुकानात तुमच्या देवादिकांचे फोटो लावता, त्यावेळी त्याचा परिणाम तुमचे ग्राहक कमी होण्यात होतो.

तुम्ही देवभक्त असाल तर दुकानात तुम्ही तुमच्या ग्राहकालाच देव मानले पाहिजे. अनेक देवभक्त दुकानदार ग्राहकाशी उद्धट वागतात, त्याचा अपमान करतात. हे म्हणजे त्याने त्याच्या खऱ्या देवाचा अपमान करण्यासारखे आहे. दुकानात गिऱ्हाईक असताना त्याला ताटकळत ठेऊन पूजा करत बसने हा निव्वळ मूर्खपणा आहे.

व्यवसाय आणि देव, व्यवसाय आणि धर्म यांची गल्लत करता कामा नये.  व्यवसायाच्या ठिकाणी केवळ व्यवसायच असायला पाहिजे.

तुम्हाला देवाची गरज असेलच तर त्याला तुम्ही तुमच्या घरात ठेवला पाहिजे. त्याच्या रहाण्यासाठी देवळेही आहेतच. पण तुम्ही दुकानात असताना तुमच्या मनात केवळ ग्राहक आणि तुमचा व्यवसाय याच गोष्टी पाहिजेत.

देवादिकांच्या पूजाअर्चेसाठी वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा तेवढा पैसा आणि वेळ कस्टमर रिलेशन वाढवण्यासाठी केलात तर तुमच्या व्यवसायातले अनेक प्रश्न सुटतील.

हेही वाचा:
सोडा हा फुकटेपणा
तुमचे प्रॉब्लेम्स सुटण्यासाठी…… 

No comments:

Post a Comment